Thursday, February 17, 2011

'वाह्यात' श्रीसंतला ढोणीचा 'कूल' सल्ला !

श्रीसंतने प्रतिस्पर्धी संघाला ' त्रास द्यावा ', आपल्या संघाला नाही, असा बोचरा सल्ला टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग ढोणीने दिला आहे. आपल्या यंग ब्रिगेडमधील या वाह्यात कार्ट्याला भडक डोकं कूल ठेवावे म्हणून ढोणीने हा मार्ग स्वीकारला आहे. S Sreesanth, Indian bowler

श्रीसंतला मी स्पष्टपणे याची कल्पना दिली आहे, की खेळताना काही मर्यादा असतात. त्या तुम्ही ओलांडू नये. तुला त्रास द्यायचाच असेल तर प्रतिस्पर्धी संघाला दे, स्वतःच्या संघाला नाही असे खडे बोल ढोणीने श्रीसंतला सुनावले.

आपल्या वेगवान गोलंदाजीपेक्षा वाचाळपणामुळे प्रसिद्ध श्रीसंतची नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कपच्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगशी शाब्दिक चकमक उडाली. श्रीसंतचा हा वाचाळपणा वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियावर उलटू नये, याकरता ढोणीने त्याला आपले माथेफिरु डोके काबूत ठेवण्याचा उपदेश दिला आहे.

आपली गोलंदाज म्हणून जबाबदारी ओळखून त्याने दोन्ही गोष्टी साध्य केल्यास मला कोणतीही अडचण नाही, असेही ढोणीने स्पष्ट केले. तो म्हणाला, की खेळताना अनेक प्रसंग घडतात, त्यात टीका-टिप्पणेही होतातच. याचा अर्थ प्रत्येक वेळी आम्ही खेळताना अशा घटना घडतातच असे नव्हे.

प्रतिस्पर्धाबरोबर संभाषण करणं वावगं नाही पण वैयक्तिक पातळीवरील टीका करता कामा नये. ही जाणीव ठेवून श्रीसंतने खेळ केल्यास कोणताच प्रश्न उद्भवणार नाही असं ढोणी पुढे म्हणतो. बरेचदा असे प्रसंग श्रीसंत आणि बॅट्समन यांच्यात घडतात, आम्हाला नक्की काय संभाषण झालं याची कल्पना येत नाही, हेही ढोणीने स्पष्ट केले.

नुकत्याच आटोपलेल्या दक्षिण आफ्रिका दौ-यात श्रीसंतने आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅंमी स्मिथवर वैयक्तिक स्वरूपाची शेरेबाजी केली होती. याआधीही शिस्तभंगाचे अनेक किस्से श्रीसंतच्या नावावर असल्याने ढोणीने श्रीसंतला त्याला शाब्दिक तलवारी म्यान करुन खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.

No comments:

Post a Comment