Wednesday, February 16, 2011

पाक फायनमध्ये आल्यास, शिवसेना वानखेडे उखडणार?

समजा २ एप्रिलला मुंबईत रंगणा-या वर्ल्ड कपच्या फायनलला भारत-पाक आमनेसामने भिडले तर... एवढेच नाही तर फक्त पाक संघ फायनलला पोहचला तर... पाकिस्तानी संघाला मुंबईत पाऊल न ठेवू देण्याची भाषा करणा-या आणि प्रसंगी वानखेडेचे पिच उखडणा-या शिवसेनेची काय भूमिका असेल, याची चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये सुरू झालीय.

त्या दिवशी सा-या जगाचे लक्ष मुंबईतल्या वानखेडेवर लागलेले असेल. त्याची तिकिटे तर कित्येक महिने आधीच विकली गेली आहेत. अशा भन्नाट सामन्याच्या दिवशी जर पाकिस्तान फायनलपर्यंत पोहोचला, तर शिवसेनेच्या ' संकल्पा ' चे काय होणार ? त्यासंदर्भात सेना नवी भूमिका जाहीर करणार का ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

१९९१ मध्ये पाकिस्तान संघ भारतात आला असताना तेव्हा सेनेत असलेले आणि आता मनसेचे खासदार असलेल्या शिशिर शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली वानखेडेची खेळपट्टी उखडण्यात आले होती. तर १९९९ मध्ये याच कारणासाठी दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानाचीही खेळपट्टीही उध्वस्त करण्यात आली होती. हाच ' इतिहास ' पुन्हा पाकिस्तान मुंबईत फायनलला आली तर उगाळला जाईल का ? अशी भिती अनेकांना वाटू लागली आहे.

या ' उखडमपट्टी ' नंतर पाकिस्तानी संघ एकदाच भारतात खेळायला आला. २००७ मध्ये झालेल्या या मालिकेमध्ये तीन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामने झाले होते. तेव्हा आयोजकांनी मुंबई सोयीस्कररित्या वगळली होती. त्या दौ-यात गुवाहटी (आसाम), मोहाली (पंजाब), कानपूर (उ.प्रदेश), ग्वाल्हेर (म.प्रदेश) आणि जयपूर (राजस्थान), दिल्ली, कोलकता (प.बंगाल), बंगळुरू (कर्नाटक) येथे सामने खेळवण्यात आले. पण आता योगायोगाने पाकिस्तान फायनलला पोहचले तर काय करणार, अशी चिंता आयोजकांनाही वाटू लागली असणार.

नुकतेच पाकिस्तानी गायक राहत फते अली खान यांना बेहिशोबी विदेशी चलन बाळगल्यामुळे ताब्यात घेतले होते. त्यावरून शिवसेनेने आणि मनसेनेही पाक कलाकारांविरोधातील आपला राग तीव्रपणे व्यक्त केला होता. हा राग ताजा असताना हे दोन्ही ' ठाकरी ' पक्ष पाकिस्तानी संघाच्या मुंबईत पाऊल ठेवू देण्यावर काय ठरवतात, हे महत्त्वाचे ठरते.

तसे काही दिवसांपूर्वी झालेल्या ' बिग बॉस - ' मध्ये सहभागी झालेल्या पाकिस्तानी कलाकार वीणा मलिकचा विरोध शिवसेना आणि मनसेने जोरदार केला होता. यापुढे कोणत्याही पाक कलाकाराला मुंबईत काम करु देणार नाही, अशी धमकीची भाषाही केली होती. या पार्श्वभूमीवर हे पक्ष काय पवित्रा घेतात याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

त्यात वर्ल्ड कप फायनल मुंबईत रंगणार असून आयसीसीच्या अध्यक्ष पदावर शरद पवार विराजमान आहेत. शिवसेना प्रमुखांचे ते राजकीय वैरी असले तरी प्रत्यक्षात ते एकमेकांचे घनिष्ठ मित्र आहेत. त्यामुळे शिवसेनेसमोर काय निर्णय घ्यावा असा प्रश्न नक्कीच पडणार आहे.

पाकिस्ताची टीम डार्क हॉर्स म्हणून ओळखली जात आहे. स्पॉट फिक्सिंगच्या वादात अडकलेली पाक टीम यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करून अचानक फायनलमध्ये धडक मारु शकते, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या फायनलमध्ये धडक मारण्याच्या विचाराने, ' ठाकरी ' पक्षाच्या निर्णयावर अनेकांना धडकी भरेल की काय असे चित्र निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment