Thursday, February 17, 2011

'वाह्यात' श्रीसंतला ढोणीचा 'कूल' सल्ला !

श्रीसंतने प्रतिस्पर्धी संघाला ' त्रास द्यावा ', आपल्या संघाला नाही, असा बोचरा सल्ला टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग ढोणीने दिला आहे. आपल्या यंग ब्रिगेडमधील या वाह्यात कार्ट्याला भडक डोकं कूल ठेवावे म्हणून ढोणीने हा मार्ग स्वीकारला आहे. S Sreesanth, Indian bowler

श्रीसंतला मी स्पष्टपणे याची कल्पना दिली आहे, की खेळताना काही मर्यादा असतात. त्या तुम्ही ओलांडू नये. तुला त्रास द्यायचाच असेल तर प्रतिस्पर्धी संघाला दे, स्वतःच्या संघाला नाही असे खडे बोल ढोणीने श्रीसंतला सुनावले.

आपल्या वेगवान गोलंदाजीपेक्षा वाचाळपणामुळे प्रसिद्ध श्रीसंतची नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कपच्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगशी शाब्दिक चकमक उडाली. श्रीसंतचा हा वाचाळपणा वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियावर उलटू नये, याकरता ढोणीने त्याला आपले माथेफिरु डोके काबूत ठेवण्याचा उपदेश दिला आहे.

आपली गोलंदाज म्हणून जबाबदारी ओळखून त्याने दोन्ही गोष्टी साध्य केल्यास मला कोणतीही अडचण नाही, असेही ढोणीने स्पष्ट केले. तो म्हणाला, की खेळताना अनेक प्रसंग घडतात, त्यात टीका-टिप्पणेही होतातच. याचा अर्थ प्रत्येक वेळी आम्ही खेळताना अशा घटना घडतातच असे नव्हे.

प्रतिस्पर्धाबरोबर संभाषण करणं वावगं नाही पण वैयक्तिक पातळीवरील टीका करता कामा नये. ही जाणीव ठेवून श्रीसंतने खेळ केल्यास कोणताच प्रश्न उद्भवणार नाही असं ढोणी पुढे म्हणतो. बरेचदा असे प्रसंग श्रीसंत आणि बॅट्समन यांच्यात घडतात, आम्हाला नक्की काय संभाषण झालं याची कल्पना येत नाही, हेही ढोणीने स्पष्ट केले.

नुकत्याच आटोपलेल्या दक्षिण आफ्रिका दौ-यात श्रीसंतने आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅंमी स्मिथवर वैयक्तिक स्वरूपाची शेरेबाजी केली होती. याआधीही शिस्तभंगाचे अनेक किस्से श्रीसंतच्या नावावर असल्याने ढोणीने श्रीसंतला त्याला शाब्दिक तलवारी म्यान करुन खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.

Wednesday, February 16, 2011

मा. पंतप्रधान, देशाची बदनामी मिडियामुळे नव्हे तर घोटाळ्यांमुळे झालीय

मा. पंतप्रधान, देशाची बदनामी मिडियामुळे नव्हे तर घोटाळ्यांमुळे झालीय


केंद्र सरकारची घसरत चाललेली प्रतिमा उंचावण्यासाठी पंतप्रधान आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय टीव्ही चॅनेल्सच्या संपादकांपुढे अवतरले. देशात घटना- घडामोडी आवाक्याबाहेर जात असताना देशाचे सीईओ असलेले पंतप्रधानांव्यतिरिक्त दुसरं कोण ही घाण साफ करू शकणार नाही. मला वाटतं पंतप्रधानांनी उचललेलं पाऊल योग्य असं होतं.
परंतु, पंतप्रधान आणि त्यांचे सल्लागार ज्याची अपेक्षा करताएत ते खरोखर यातून साध्य होणार आहे का? मला तर ते शक्य वाटत नाही. उलट ते मोठ्या प्रमाणावर अपयशी झालेले दिसत आहेत. त्यांच्यात निराशा वाढली असून घोटाळे उघड केल्याबद्दल ते माध्यमांनाच दोष देत आहेत.
निष्ठुरपणे घोटाळे उघड केले जात असल्यानं देशाची प्रतिष्ठा कमजोर झाली असल्याचं सांगून पंतप्रधानांनी आपल्या स्वगतापासूनच याची सुरुवात केली. माननीय पंतप्रधान, आम्हाला ते माहिती आहे. मिडियानं काय करायलं हवंय असं तुम्हाला वाटतं? मंत्री, राजकारणी, उद्योगपती आणि बाबूंद्वारे देशाची होत असेलली लूट शांतपणे पाहून त्याकडे दुर्लक्ष करणे हेच तुम्हाला अपेक्षित होतं का?

नाही, माननीय पंतप्रधान. ते शक्य होणार नाही. केवळ चांगल्या गोष्टींचं कौतूक करून नकारात्मक बातम्या विसरण्याचा तुमचा सल्ला केवळ कागदावर बरा वाटतो. वास्तवात मात्र लूटारुंना मोफत परवाने देऊन आमची लूट केली जाते. आणि जर का मिडियाने कॉमनवेल्थ गेम्स, टू जी स्पेक्ट्रम, आदर्श सोसायटी घोटाळा, सीव्हीसीची नियुक्ती आणि ताज्या इस्त्रो स्पेक्ट्रम घोटाळे उघड केले नसते तर आम्हाला त्या मागचं खरं वास्तव कळलंही नसतं.
हा पर्दाफाश केल्यानं का जर देशाची बदनामी होत असेल तर ती स्वीकारायला मी तयार आहे. मला वाटतं की पर्दाफाश होत असताना तोंड लपवण्यापेक्षा वास्तव स्वीकारण्याची हीच खरी वेळ आहे. माझा मुद्दा असा आहे की आपण निराशेचा सूर काढणं बंद केलं पाहिजे. सध्या निराशेचा सूर आळवला जातोय. मी अनेकदा म्हटलं आहे की उत्तर कोरियाच्या हुकूमशहापेक्षाही जास्त आपण आपल्या भोळ्या नागरिकांसमोर निराशेचा सूर आळवत असतो.
आम्ही किती महान आहोत, आमची लोकशाही किती महान आहे. शून्याचा शोध आम्ही लावला इत्यादी इत्यादी. डॉ. सिंग यांनी ही परंपरा कायम राखत म्हणाले की मी जगात जिथं कुठं जातो, लोकांना भारताचे कुतूहल वाटतं. आमच्या विकास दराबाबत त्यांना कुतूहल वाटतं. आमच्या क्रियाशील लोकशाहीचे त्यांना कुतूहल वाटतं.
डॉ. सिंग, तुम्ही अगदी योग्य बोललात... पण मला आशा आहे की तुम्हाला हेही माहितच असेल की तोंडावर स्तुती करणारे मागे आमच्यावर हसतात. भारत आणि भारतीयांसोबत काम करण्याचे सर्वोत्तम मार्ग त्यांना माहित आहे आणि तो मार्ग म्हणजे तोंडावर स्तुती केली की आम्ही आमचे दरवाजे त्यांना सताड उघडे करून देतो. त्यानंतर कसलीही चर्चा किंवा बोलणी करण्याची गरजच उरत नाही. खोट्या स्तुतीची आम्हाला इतकी सवय झालीय की त्याच्या बदल्यात आम्ही त्यांना काहीही देऊ शकतो. भारतात व्यवसाय करायचा असेल तर कंटाळा येईस्तोवर त्यांची स्तुती करा, असं एका ज्येष्ठ ब्रिटिश अधिकारी बोलला होता. जुलै २०१० मध्ये मी लिहिलेल्या एका पोस्टमध्ये याविषयी लिहिले होते.
पंतप्रधानांच्या पत्रकारांसोबतच्या आजच्या चर्चेवर प���त येऊ. पंतप्रधानांनी दिलेली बहुतांश उत्तरे आम्हाला यापूर्वी माहित होते.  आघाडी सरकार चालवताना काही मजबूरी असते किंवा भ्रष्टाचाराची प्रकरणं हाताळण्यासाठी आमच्याजवळ योग्य ती यंत्रणा आहे किंवा देशाचे  प्रशासन आम्ही उत्तम पद्धतीने सांभाळू आणि देशाला चांगलं काम करणा-या सरकारची गरज असून आम्ही त्याबद्दल वचनबद्ध आहोत... इत्यादी इत्यादी.
आजच्या संवाद कार्यक्रमात केवळ एकमेव प्रश्नानं पंतप्रधान कदाचित चिडू शकले असते तो असा होता की सीबीआय सांगते की टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात नुकसान झालं तर दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल सांगतात यात शून्य नुकसान झालेय, तर या दोघांपैकी कोण खरय.? असं विचारताच पंतप्रधानांच्या माध्यम सल्लागाराने 'कृपया पंतप्रधानांसोबत जरा विनम्रता दाखवा.' असं सांगत प्रश्नकर्त्यालाच झापलं.
नाही, माननीय पंतप्रधान, सरकारचा मागचा रेकॉर्ड पाहता आज टीव्ही संपादकांसोबत झालेला संवाद ही सुद्धा तुमची कमकुवत कामगिरीच होती. तुम्ही परत एकदा आम्हाला लाजिरवाणं केलं.   

रिव्ह्यूः मला आई व्हायचंय

सरोगेट मदर हा आजही चर्चेचा विषय आहे. प्रगत शास्त्राकारणे जन्म आईच्या शरीराबाहेर घेणं शक्य असलं तरी मनाचं काय... या किचकट गुंत्यातल्या या नात्याचा उलगडा करू पाहणारा एक सिनेमा नुकताच प्रदशिर्त झालाय. 'मला आई व्हायचंय' हे त्या सिनेमाचं नाव. मराठी सिनेमात इंग्रजी अभिनेत्री आणि छोट्या बाळाचा वापर करून घेत या सिनेमाच्या विषयाला दिग्दर्शिकेने अतिशय छान रंगवलंय. मध्यंतराच्या आधी आणि नंतरही थोडावेळ सिनेमाची रंगत चांगली खुलवली आहे. पण शेवटाकडे पसरत गेलेला ओहोळ आवरता आला असता तर सिनेमाला उत्तम आकार येऊ शकला असता. त्यामुळेच पेक्षकाला खिळवून ठेवायची क्षमता असणारा हा सिनेमा शेवटाकडे उगाचच पसरवल्याची हूरहूर सिनेमा पाहून झाल्यावर राहून जाते.

एका विवाहित अमेरिकन मॉडेलला मूल हवं असतं. पण बाळंतपणामुळे बेढबपणा येईल या भीतीने ती सरोगसीचा मार्ग निवडते. भारतात कमी पैशात भाड्याने आई मिळू शकते हे कळल्यावर ती महाराष्ट्रातल्या एका गावात येते. तिथे एका अशिक्षित गरजवंत महिलेची ती निवड करते. सगळं सुरळीत सुरू असतं. पण सहाव्या महिन्यात कळतं की बाळात काही दोष असण्याची शक्यता आहे. हे कळल्यावर ती आपलं बाळ स्वीकारायचं नाकारते. मग पुढे त्या बाळाचं काय होतं? त्याला आई मिळते का? भाड्याची आई आणि खरी आई या गुंतगुंतीच्या प्रश्ानची उकल नक्की काय, अशा अनेक प्रश्ानंची उत्तरं शोधत हा सिनेमा पुढे जातो.

सरोगेट आईची भूमिका अभिनेत्री उमिर्ला कानेटकरनी केली आहे आणि तिने खरोखरच अप्रतिमरीत्या ती जबाबदारी पेलली आहे. डोळ्यांमधला निरागस भाव आणि तरीही त्यातलं जाणतेपण उत्तम उभं केलंय. तिचं सोसलेपण, भाड्याचं असलं तरी आईपण प्राप्त झाल्यावर तिच्यात होणारे बदल तिने अतिशय सहजपणे रंगवले आहेत. फॉरेनर बाईच्या सहवासात पहिल्यांदा असणारं आखडलेपण आणि नंतर येणारी सहजता खूप छान. खेडवळ भाषेत बोलणारी ही स्त्री 'गणप्या इज कम' असं एखादं वाक्य टाकते तेव्हा खूप गंमत वाटते. फॉरेनर बाईची भूमिका साकारणारी स्टेसी बी मात्र फक्त भूमिकेची गरज पूर्ण करते. सुरुवातीपासूनच तिचा वावर कृत्रिमतेकडे झुकणारा आहे. अभिनयात त्या मेरीपुढे यशोदा उजवी ठरल्याचं अगदी स्पष्टपणे जाणवतं. पण त्याने विशेष काही फरक पडत नाही म्हणा. मॅट रिडर या अमेरिकन छोट्या मुलाचा अभिनय मात्र अप्रतिम. त्याने ग्रामीण बाजासह सिनेमाच्या नाट्याला आवश्यक असणारी भावूकता अगदी लिलया उभी केलीय. कधी कधी त्याचे संवाद किंवा अभिनय 'जरा अति' या सदरात मोडणारा असला तरी तो मुलगा खूपच गोड आहे आणि त्याच्यामुळे सिनेमातलं नाट्य खऱ्याअर्थाने रंगीत झालंय. गणप्या ही व्यक्तिरेखाही चांगली वठली आहे.

कृष्णाच्या फोटोसमोर गर्भार यशोदा हात जोडून असताना तिची खरी ख्रिश्चन आई त्याशेजारी येशुचा फोटो आणून ठेवते यासारखे प्रसंग. लहानग्या फॉरेनर दिसणाऱ्या माधवच्या तोंडी खेड्यातल्या भाषेत असणारे निरागस संवाद तर खूपच गोड वाटतात आणि मजा येते.

गाणी खूप ठसणारी नसली तरी बरी. छायाचित्रण मात्र खूप सुंदर वठलंय. दिग्दर्शन बरं असलं तरी शेवटाकडे शेतकऱ्यांचा प्रश्ान्, किंवा उमिर्लाच्या मुलीचा एक छोटा ट्रॅक अशी ठिगळं लावायची काहीच गरज नव्हती. सरळपणे या कथेला टोक दिलं असतं तर उत्तम झालं असतं. पण तसं न झाल्यामुळे मध्यंतरानंतर काही वेळाने सिनेमा उगाचच खेचत नेल्यासारखं वाटायला लागतं आणि कंटाळा यायला लागतो. निर्माती समृद्धी पोरेने दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद, अभिनय, गीत लेखनअशा अनेक जबाबदाऱ्या एकहाती उचलल्या आहेत. ते निश्चितच कौतुकाचं आहे. तरी कदाचित सिनेमा सुटसुटीत करताना मात्र काही ठिकाणी तिची तारांबळ उडाल्याची दिसते.

असो. सिनेमाचा विषय तसा नवा नसला तरी मेलोड्रॅमाची व्यवस्थित फोडणी घालून करमणूकमूल्य व्यवस्थित राखलं आहे. समृद्धी पोरेनी सिनेमाच्या असंख्य जबाबदाऱ्या एकाहाती पेलत केलेला हा प्रयत्न सकारात्मक नक्कीच आहे. हा सिनेमा अजून चांगला वठू शकला असता हे खरं असलं तरी अस्सल मराठमोळ्या सिनेमाच्या चाहत्यांची निराशा मात्र नक्कीच होणार नाही.

निर्माती/दिग्दर्शिका/संकल्पना/कथा/पटकथा/संवाद/गीत/अभिनय : समृद्धी पोरे

छायाचित्रण : राहूल जाधव

संगीत : अशोक पत्की

गायक : कुणाल गांजावाला, वैशाली सामंत

कलाकार : उमिर्ला कानेटकर, स्टॅसी बी, विवेक राऊत, सुलभा देशपांडे, अक्षय देशपांडे, सुचित्रा बांदेकर.

दर्जा : ***

पाक फायनमध्ये आल्यास, शिवसेना वानखेडे उखडणार?

समजा २ एप्रिलला मुंबईत रंगणा-या वर्ल्ड कपच्या फायनलला भारत-पाक आमनेसामने भिडले तर... एवढेच नाही तर फक्त पाक संघ फायनलला पोहचला तर... पाकिस्तानी संघाला मुंबईत पाऊल न ठेवू देण्याची भाषा करणा-या आणि प्रसंगी वानखेडेचे पिच उखडणा-या शिवसेनेची काय भूमिका असेल, याची चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये सुरू झालीय.

त्या दिवशी सा-या जगाचे लक्ष मुंबईतल्या वानखेडेवर लागलेले असेल. त्याची तिकिटे तर कित्येक महिने आधीच विकली गेली आहेत. अशा भन्नाट सामन्याच्या दिवशी जर पाकिस्तान फायनलपर्यंत पोहोचला, तर शिवसेनेच्या ' संकल्पा ' चे काय होणार ? त्यासंदर्भात सेना नवी भूमिका जाहीर करणार का ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

१९९१ मध्ये पाकिस्तान संघ भारतात आला असताना तेव्हा सेनेत असलेले आणि आता मनसेचे खासदार असलेल्या शिशिर शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली वानखेडेची खेळपट्टी उखडण्यात आले होती. तर १९९९ मध्ये याच कारणासाठी दिल्लीतील फिरोजशहा कोटला मैदानाचीही खेळपट्टीही उध्वस्त करण्यात आली होती. हाच ' इतिहास ' पुन्हा पाकिस्तान मुंबईत फायनलला आली तर उगाळला जाईल का ? अशी भिती अनेकांना वाटू लागली आहे.

या ' उखडमपट्टी ' नंतर पाकिस्तानी संघ एकदाच भारतात खेळायला आला. २००७ मध्ये झालेल्या या मालिकेमध्ये तीन कसोटी आणि पाच एकदिवसीय सामने झाले होते. तेव्हा आयोजकांनी मुंबई सोयीस्कररित्या वगळली होती. त्या दौ-यात गुवाहटी (आसाम), मोहाली (पंजाब), कानपूर (उ.प्रदेश), ग्वाल्हेर (म.प्रदेश) आणि जयपूर (राजस्थान), दिल्ली, कोलकता (प.बंगाल), बंगळुरू (कर्नाटक) येथे सामने खेळवण्यात आले. पण आता योगायोगाने पाकिस्तान फायनलला पोहचले तर काय करणार, अशी चिंता आयोजकांनाही वाटू लागली असणार.

नुकतेच पाकिस्तानी गायक राहत फते अली खान यांना बेहिशोबी विदेशी चलन बाळगल्यामुळे ताब्यात घेतले होते. त्यावरून शिवसेनेने आणि मनसेनेही पाक कलाकारांविरोधातील आपला राग तीव्रपणे व्यक्त केला होता. हा राग ताजा असताना हे दोन्ही ' ठाकरी ' पक्ष पाकिस्तानी संघाच्या मुंबईत पाऊल ठेवू देण्यावर काय ठरवतात, हे महत्त्वाचे ठरते.

तसे काही दिवसांपूर्वी झालेल्या ' बिग बॉस - ' मध्ये सहभागी झालेल्या पाकिस्तानी कलाकार वीणा मलिकचा विरोध शिवसेना आणि मनसेने जोरदार केला होता. यापुढे कोणत्याही पाक कलाकाराला मुंबईत काम करु देणार नाही, अशी धमकीची भाषाही केली होती. या पार्श्वभूमीवर हे पक्ष काय पवित्रा घेतात याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

त्यात वर्ल्ड कप फायनल मुंबईत रंगणार असून आयसीसीच्या अध्यक्ष पदावर शरद पवार विराजमान आहेत. शिवसेना प्रमुखांचे ते राजकीय वैरी असले तरी प्रत्यक्षात ते एकमेकांचे घनिष्ठ मित्र आहेत. त्यामुळे शिवसेनेसमोर काय निर्णय घ्यावा असा प्रश्न नक्कीच पडणार आहे.

पाकिस्ताची टीम डार्क हॉर्स म्हणून ओळखली जात आहे. स्पॉट फिक्सिंगच्या वादात अडकलेली पाक टीम यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी करून अचानक फायनलमध्ये धडक मारु शकते, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या फायनलमध्ये धडक मारण्याच्या विचाराने, ' ठाकरी ' पक्षाच्या निर्णयावर अनेकांना धडकी भरेल की काय असे चित्र निर्माण झाले आहे.